लिहू वाचू आनंदे…
आई या शब्दात आपल्या जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. आईचा सहवास, माया, तिने बाल मनावर केलेले संस्कार, पटवून दिलेलं व्यायामाच महत्व, कोणत्याही कठीण प्रसंगी सामोरे जाण्यासाठी सक्षम केलेलं मन, इत्यादीचा अनुभव ज्यांनी घेतला आहे त्यांना आई या शब्दातील आपल्या जीवनाच दडलेलं रहस्य समजून येतं. असंच मी म्हणेन कारण आईने आपल्यासाठी, आपल्याला मोठं करण्याकरिता घेतलेले कष्ट आपण कधीच विसरू शकत नाही. फक्त आईचं आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. आपल्याला ती नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवून जन्म देते. बाळाचा जन्म म्हणजे आईचा पुनर्जन्म. पुनर्जन्मानंतर ती बाळाला म्हणते, "खरंच, तू मला आई होण्याचं भाग्य दिलंस. हे भाग्य दिल्याची उतराई मी कशी करु ". त्यावेळी कळत नसूनही बाळ हसत, तेव्हा तिच्या आनंदाला भरती येते नी ती आई बाळाला आपलं दुध पाजून त्याला आणि स्वतःलाही तृप्त करते. अशा आपल्या आईला आपण कधीही दु:ख देवू नये वाईट बोलू नये आणि कधीही अंतर देवू नये कारण तिचे चांगले आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असतात म्हणूनच आपण आपल्या जीवनात यशस्वी होत असतो. सुखी जीवनाचा आनंद घेत असतो. याचा विचार आपण सर्वांनी निश्चितपणे करावयास हवा असे मला मनापासून वाटते. ( इथे मला आईची मुलं म्हणजे मुलगा - मुलगी अपेक्षित आहेत. ) कुठल्याही संकटाच्यावेळी आपल्या तोंडातून प्रथम शब्द " आई " येतो याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. अशा आपल्या प्रेमळ आईला निश्चितपणे सुखी करण्याचा, आनंद देण्याचा निश्चय करू या. या निश्चयातून आपल्याला सुखी आनंदी आणि सुंदर जीवन जगण्याची गुरुकिल्ली मिळणार आहे. आपण मिळविणार ना ही गुरुकिल्ली.
प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, ०८०५२०१३.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा